शासकीय आशादिप महिला वसतीगृह, जळगावची विद्यार्थिनी यशस्वी वाटचालीकडे
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शासकीय आशादिप महिला वसतीगृह, जळगाव येथे राहत असलेली आणि मुलींच्या निरीक्षणगृहातून दाखल झालेली अनाथ विद्यार्थिनी लक्ष्मी विलास शिंदे हिने बारावीची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. ती बेंडाळे कॉलेज, जळगाव येथे आर्ट्स शाखेत शिकत होती आणि तिने 50 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण केली आहे.
लक्ष्मी ही 18 जून 2024 रोजी मुलींच्या निरीक्षणगृह, जळगाव येथून शासकीय आशादिप महिला वसतीगृहात दाखल झाली होती. तिचे आई-वडील नसून दोन लहान भाऊ आहेत. हे दोघेही मुलांचे निरीक्षणगृह, जळगाव येथे शिक्षण घेत आहेत.
लक्ष्मीला पोलिस दलात भरती होण्याची प्रबळ इच्छा असून, तिला सौंदर्य क्षेत्रातील अर्थात पार्लर चालवण्याचाही छंद आहे. तिच्या या यशाबद्दल वसतीगृहातील सर्व कर्मचाऱ्यांनी आणि अधिकारी वर्गाने अभिनंदन केले आहे.
या यशामध्ये परीवेक्षा अधिकारी तथा अतिरिक्त कारभार अधिकारी सोनिया देशमुख यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. अनाथ असूनही जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर लक्ष्मीने यशाचे पाऊल टाकले आहे.
टिप्पणी पोस्ट करा