Top News

जळगावात कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा : तीन महिलांची सुटका, पाच जण ताब्यात

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील खेडी परिसरात एका कॉलेजजवळ गुपचूपपणे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर शनिपेठ पोलिसांनी धाड टाकून तीन पीडित महिलांची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी दोन गिऱ्हाईक आणि व्यवसाय चालवणारे दांपत्यासह एक अशा पाच जणांना ताब्यात घेतले असून एका महिलेवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना खेडी परिसरातील एका कॉलेजजवळ महिलांचा जबरदस्तीने वेश्याव्यवसायासाठी वापर केला जात असल्याची माहिती मिळाली होती. स्थानिक नागरिकांकडून देखील याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले.

त्यानुसार गुरुवारी (दि. ८ मे) दुपारी चार वाजता शनिपेठ पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला. सुरुवातीला डमी गिऱ्हाईक पाठवून खात्री केल्यानंतर पोलिसांनी अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान कुंटणखाना चालवणारे दांपत्य आणि एक अन्य अशा तिघांना घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले. तसेच त्या ठिकाणी जबरदस्तीने ठेवण्यात आलेल्या तीन महिलांची सुटका करण्यात आली. या ठिकाणी ग्राहक म्हणून उपस्थित असलेले दोन पुरुषही पोलिसांच्या तावडीत सापडले.

याप्रकरणी एकूण पाच जणांवर कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी संशयित महिलेसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

पोलिसांची धडक कारवाई 
या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय खैरे, इंदल जाधव, पोलिस कॉन्स्टेबल विक्की इंगळे, अमोल वंजारी, अनिल कांबळे, निलेश घुगे आणि महिला पोलीस काजल सोनवणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू 
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा शनिपेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून यामध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने