पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत पाचोऱ्याच्या खेडगावातील जवान मनोज पाटील यांचा देशसेवेचा अभिमानास्पद निर्णय
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने निमलष्करी दलातील सुट्टीवर गेलेल्या जवानांना तातडीने परत मुख्यालयात हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पाचोरा तालुक्यातील खेडगाव येथील जवान मनोज ज्ञानेश्वर पाटील यांनी एक अत्यंत भावनिक पण देशप्रेमाने भरलेला निर्णय घेतला आहे.
मनोज पाटील यांचा विवाह नुकताच ५ तारखेला नाचणखेडे (ता. पाचोरा) येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी पार पडला. लग्नासाठी काही दिवसांची रजा घेऊन ते गावी आले होते. मात्र देशात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे त्यांना पुन्हा एकदा तातडीने कर्तव्यावर हजर होण्याचे आदेश मिळाले. त्यांनीही क्षणाचाही विलंब न करता, फक्त तीनच दिवसांपूर्वी विवाह झालेला असूनही, ८ मे रोजी सीमेसाठी रवाना होण्याचा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे मनोज यांच्या अंगावर अद्याप हळदीचा रंगही सुकलेला नसतानाच ते देशाच्या रक्षणासाठी पुढे सरसावले आहेत. नवविवाहित जीवनाच्या सुंदर स्वप्नांना, सहजीवनाच्या गोड कल्पनांना, सुट्टीतील आनंदाला मागे टाकत त्यांनी देशसेवेचे व्रत प्राधान्य दिले.
यावेळी मनोज यांचे वडील ज्ञानेश्वर पाटील यांनी अभिमानाने सांगितले, “माझ्या मुलाने देशासाठी असा निर्णय घेतला हे आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. देशापेक्षा मोठे काहीही नाही.”
तर नवविवाहिता यामिनी यांनीही खंबीरपणे प्रतिक्रिया देताना सांगितले, “देशसेवा हीच सर्वोच्च प्राधान्याची आहे. कठीण प्रसंगीही आम्ही एकत्र आहोत, आणि मनोजच्या निर्णयाचा मला अभिमान आहे.”
देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची ही भावना केवळ मनोज यांचीच नव्हे, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची आहे. खेडगावसारख्या लहानशा गावातून देशसेवेच्या या अभिमानास्पद पावलाने संपूर्ण जिल्ह्याचा मस्तक उंचावले आहे.
टिप्पणी पोस्ट करा