Top News

बांधकाम कामगार भांडी योजनेत गैरव्यवहार; लाभार्थ्यांची आर्थिक लूट सुरूच!

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहर आणि परिसरात मोठ्या संख्येने बांधकाम कामगार कार्यरत आहेत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या "भांडी वाटप योजना"अंतर्गत, पात्र कामगारांना ३० वस्तूंचा स्वयंपाकासाठी उपयुक्त असलेला घरेलू भांडी सेट मोफत देण्यात येतो. मात्र, ही योजना भ्रष्टाचाराचा अड्डा ठरली असून अनेक लाभार्थ्यांकडून ठेकेदारांचे एजंट पैसे उकळत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.

योजनेचे लाभार्थी असलेल्या बांधकाम कामगारांना भांडी मिळवण्यासाठी ठेकेदारांकडे हेलपाटे मारावे लागत असून, कुठल्याही अधिकृत कॅम्पची माहिती देण्यात येत नाही. काही प्रकरणांमध्ये ठेकेदाराचे एजंट लाभार्थ्यांकडून ८०० ते १२०० रुपये उकळून रात्रीच्या वेळी थेट घरी जाऊन भांडी देत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मोफत असलेल्या या योजनेत गरजू कामगारांची आर्थिक लूट होत आहे.

या प्रकारामुळे शासनाच्या कल्याणकारी योजनांचा अपमान होत असून प्रशासनाचा देखील या गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. भांड्यांसाठी पैसे घेणाऱ्यांवर कारवाई होणार का? आणि प्रशासन कधी जागे होणार? असा प्रश्न सध्या कामगारांच्या वतीने उपस्थित केला जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने