जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य असून, सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा बंदोबस्त हीच त्यांची भूमिका आहे. मात्र जळगाव जिल्ह्यातील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी या ब्रीदवाक्याला हरताळ फासल्याने संपूर्ण विभागाची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे आता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कारवाईचा बडगा उचलून पोलीस खात्यात शिस्त आणण्याची गरज निर्माण झाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जळगाव जिल्हा लाचखोरी, खंडणी, आणि ड्रग्स प्रकरणांमुळे राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. दोन महिन्यांपूर्वी गुन्हे शाखेतील दोन पोलीस कर्मचारी गुटख्याच्या कारवाईत अडथळा आणण्यासाठी पैसे घेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच गुन्हे शाखेतीलच एका पोलीस उपनिरीक्षकाने फरार आरोपीशी तब्बल ३०० वेळा संवाद साधल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर कारवाई झाली. त्यानंतर शहर पोलीस स्थानकातील दोन कर्मचाऱ्यांनी लाच घेतल्याचे उघडकीस आले होते. आता चाळीसगावमध्ये एका अत्याचाराच्या प्रकरणात निर्दोष व्यक्तीला अडकवून तब्बल १.२० लाख रुपयांची खंडणी उकळल्याची घटना समोर आली आहे.
या घटनांमुळे सामान्य नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास ढासळत चालला आहे. जर रक्षण करणारेच भक्षक बनू लागले, तर मग न्यायासाठी जनता कोणाकडे पाहणार? त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी काही महिन्यांपूर्वीच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शहरात वाढत चाललेल्या ड्रग्स प्रकरणाबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र आजतागायत यावर ठोस कारवाई झालेली नाही. स्थानिक आमदाराने आवाज उठवल्यानंतरही पोलीस विभाग गप्प का? शहरातील तरुण पिढी ड्रग्सच्या विळख्यात अडकत असल्याच्या संशयाला त्यामुळे बळ मिळत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर, जळगाव पोलीस विभागाची प्रतिमा पुन्हा उभी करण्यासाठी कडक पावले उचलण्याची वेळ आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा