जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I भुसावळ तालुक्यातील शिंदी गावातील आकाश अशोक चव्हाण (वय २२) या तरुणाने विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. प्रकृती खालावल्यामुळे त्याला भुसावळ येथील खासगी रुग्णालयातून पुढील उपचारासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रविवारी मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शिंदी गावात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
आकाश हा पुणे येथे शिक्षण घेत असतानाच कामही करत होता. तो आई, लहान बहीण आणि आजोबांसह शिंदी येथे राहत होता. त्याची आई हातमजुरी करून घर चालवत होती, तर बहीण अजून शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वी आकाशने विषारी औषध सेवन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याला तातडीने भुसावळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्यामुळे रविवारी त्याला जळगाव शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच भुसावळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आकाशच्या अकस्मात निधनामुळे संपूर्ण गावात शोकाची लाट पसरली असून, आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा