जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I महानगरपालिकेच्या उदासीन कारभारावर निशाणा साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात खड्डेभरो आंदोलन करण्यात आले. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांचा आणि नागरिकांच्या त्रासाचा मुद्दा मनसेने जोरकसपणे उचलून धरला. आंदोलनाच्या वेळी मनसे कार्यकर्त्यांनी श्रमदान करत स्वतःच्या खर्चाने मुरूम टाकून खड्डे बुजवले. यावेळी परिसरातील नागरिकांनीही मनसेच्या उपक्रमाचे कौतुक करत आभार मानले.
यापुढे रस्त्यावर कुठेही खड्डा दिसला, तर त्या ठिकाणी झाडे लावून महानगरपालिकेच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यात येईल, असा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला. “महानगरपालिका, माजी नगरसेवक, आमदार आणि खासदार हे जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे आता मनसेच पुढाकार घेणार,” असे मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. जमिल देशपांडे यांनी सांगितले.
या आंदोलनात मनसेचे उपशहर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जनहितचे संदीप मांडोळे, प्रकाश जोशी, साजन पाटील, राहुल चव्हाण, खुशाल ठाकूर, विकास पाथरे, उमेश आठरे, विशाल जाधव, विनोद पाटील तसेच महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुप्रीम कॉलनीतील रस्त्यांची दयनीय अवस्था व वारंवारच्या तक्रारी असूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, मनसेने आता याबाबत अधिक आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. “सत्ताधाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना हाल सहन करावे लागत आहेत. याला वाचा फोडण्यासाठी मनसेचा संघर्ष सुरूच राहील,” असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा