Top News

जळगावातून कृषी विभागाची मोठी कारवाई ; आंबा बागेत लपवलेले १२.७२ लाखांचे बोगस कापूस बियाणे जप्त


जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I चोपडा तालुक्यातील तावसे येथे कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने गुरुवारी मोठी कारवाई करत आंब्याच्या बागेत लपवलेले सुमारे १२.७२ लाख रुपयांचे बनावट आणि प्रतिबंधित HTBT कापूस बियाणे जप्त केले. या कारवाईत संशयित आरोपी जीवनलाल चौधरी याच्याविरुद्ध विविध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा भरारी पथकास बनावट बियाण्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, आणि पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई राबविण्यात आली.

जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांच्या नेतृत्वाखालील पथकात विभागीय गुणवत्ता निरीक्षक उल्हास ठाकूर (नाशिक), कृषी सहाय्यक सदाशिव बारेला, किरण गोसावी, पोलीस पाटील अर्चना पाटील, कृषी अधिकारी किरण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल चेतन महाजन आणि निलेश पाटील यांचा समावेश होता.

गुप्त माहितीच्या आधारे मौजे कुरवेल येथील नदीकिनाऱ्यावरील आंब्याच्या शेतात छापा टाकण्यात आला. तपासणीदरम्यान आंब्याच्या झाडाखाली गावातने झाकून ठेवलेले "योद्धा" व "सिल्वर R" नावाने छापलेले HTBT कापसाचे ८५० पाकिटांचा साठा आढळून आला. या बियाण्यांची एकूण किंमत १२,७२,००० रुपये इतकी आहे. हे बियाणे अनधिकृत, विनापरवाना व प्रतिबंधित स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणात बियाणे कायदा, बियाणे नियम, अत्यावश्यक वस्तू अधिनियम, महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियम, आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांनी तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने