जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I भुसावळ शहरातील गंगाराम प्लॉट परिसरात सोमवारी (दि. 12 मे) सकाळी 10.30 वाजता आत्महत्येची एक धक्कादायक घटना घडली. 52 वर्षीय डिगंबर बढे यांनी स्वतःवर गावठी कट्ट्याने गोळी झाडून आत्महत्या केली असून, या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
डिगंबर बढे हे एका खासगी ट्रॅव्हल कंपनीत कार्यरत होते. सोमवारी सकाळी त्यांच्या पत्नी, मुलगी आणि जावई दीपनगर येथे गेले होते. त्या दरम्यान ते घरात एकटेच होते. याच वेळी त्यांनी गावठी कट्ट्याचा वापर करून स्वतःवर गोळी झाडली. गोळी झाडल्याचा आवाज ऐकून शेजारी तात्काळ त्यांच्या घराकडे धावले.
घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक नितीन धांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी दाखल होत प्राथमिक तपास सुरू केला आहे.
दरम्यान, गावठी कट्टा डिगंबर बढे यांच्या हातात कुठून आणि कशामुळे आला, याचा तपास पोलिसांकडून सुरू असून, या घटनेने स्थानिकांमध्ये चिंता निर्माण केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा