जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जगातील दुसऱ्या क्रमांकाची आणि भारतातील सर्वात मोठी ठिंबक सिंचन प्रणाली उत्पादक कंपनी जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड (BSE: 500219 / NSE: JISLJALEQS) ने ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठीचे लेखापरीक्षित (ऑडिटेड) एकत्रित व स्वतंत्र आर्थिक निकाल जाहीर केले.
कंपनीने एकत्रित पातळीवर ५७७९.३ कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदवले असून EBITDA ७१६.८ कोटी रुपये झाला आहे. करानंतरचा नफा (PAT) २५.७ कोटी रुपये इतका आहे. कंपनीच्या स्वतंत्र उत्पन्नाची आकडेवारीही सकारात्मक असून वर्षभरात ते ३२५९ कोटी रुपयांवर पोहोचले. चौथ्या तिमाहीत (Q4FY25) स्वतंत्र उत्पन्न १०२७.३ कोटी रुपये इतके नोंदवले गेले आहे.
आज (१४ मे) जळगाव येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हे आर्थिक निकाल मंजूर करण्यात आले.
याबाबत माहिती देताना उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन म्हणाले:
> “२०२४-२५ च्या चौथ्या तिमाहीत आम्ही महसुलात १.३ टक्क्यांची सुधारणा करत स्थिर कामगिरी केली. EBITDA मध्येही थोडी वाढ नोंदवली. संपूर्ण वर्षात महसुलात थोडी घट झाली, जी प्रामुख्याने देशांतर्गत व्यवसायामुळे होती. मात्र, खेळत्या भांडवलाच्या कार्यक्षम व्यवस्थापनामुळे रोख प्रवाहात मोठी सुधारणा झाली आहे.
> सध्या आम्ही पाईपिंग, हाय-टेक अॅग्री आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय यावर लक्ष केंद्रित करत आहोत. सरकारच्या पायाभूत सुविधांवरील खर्चात वाढ आणि स्थिर कृषी उत्पादनामुळे आगामी काळात मागणीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे. आमचे लक्ष्य कर्ज कमी करणे, खेळते भांडवल अधिक कार्यक्षम करणे आणि रोख प्रवाह सुधारण्यावर आहे.”
जैन इरिगेशन सिस्टीम्स ही मायक्रो इरिगेशन, पीव्हीसी व एचडीपीई पाईप्स, प्लास्टिक शीट्स, प्रक्रिया केलेली कृषी उत्पादने, नवीकरणीय ऊर्जा, टिश्यू कल्चर रोपे, वित्तीय सेवा व इतर कृषी निविष्ठांच्या उत्पादनामध्ये कार्यरत असलेली अग्रगण्य कंपनी आहे.
टिप्पणी पोस्ट करा