जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील तुकाराम वाडी परिसरात मध्यरात्री सुमारे अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान टोळक्याने मोठा गोंधळ घातला. सुरेश ओतारी यांच्या खून प्रकरणातून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर काही तरुणांनी महिलांसह अनेक घरांवर दगडफेक केली, दमदाटी केली आणि वाहनांची तोडफोड करून गंभीर नुकसान केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शारदा सुकलाल ठाकुर (वय ४०, रा. तुकाराम वाडी) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, स्वप्निल उर्फ गोलू धर्मराज ठाकुर, निशांत प्रताप चौधरी, अरुण उर्फ टीनू भिमराव गोसावी, मुन्ना पहिलवान, पारस सोनवणे, बेंडा अज्या, गौरव मिस्तरी आणि ५-६ अज्ञात तरुणांनी मिळून हा हल्ला केला.
शारदा ठाकुर यांनी सांगितले की, त्या आपल्या पती व दोन मुलींसोबत घरात झोपलेल्या असताना अचानक दरवाज्यावर लाठ्या, काठ्या आणि दगडांचा मारा सुरू झाला. दरवाजा अर्धवट उघडल्यावर समोर गोलू ठाकुर व त्याचे साथीदार उभे होते. त्यांनी अश्लील शिवीगाळ करत दमदाटी केली.
टोळक्याचा पुढील राग कल्पना दिलीप बाविस्कर यांच्या घरावर निघाला. त्यांनी घरात घुसून कल्पना आणि त्यांच्या सून प्रियंका प्रफुल बाविस्कर यांना शिवीगाळ केली आणि त्यांच्या दुचाकीचे नुकसान केले.
रुपाली विजय पवार यांच्या घराजवळील कूलर खाली फेकून फोडण्यात आला. वॉशिंग मशीन आणि पाण्याच्या टाक्याही फोडण्यात आल्या. तसेच सम्राट कॉलनीतील सविता भगवान महाजन यांच्या घराच्या खिडकीची काच फोडून पल्सर मोटरसायकल व सायकलवरही दगडफेक करण्यात आली.
या गंभीर प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा