जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायकल चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी एका १९ वर्षीय युवकाला अटक केली आहे. आरोपीकडून दोन सायकली हस्तगत करण्यात आल्या असून, त्यांची एकूण किंमत अंदाजे २६ हजार रुपये आहे. ही कारवाई २८ मे रोजी पहाटे करण्यात आली.
२७ मे रोजी दुपारी १२ ते २ दरम्यान गजेन्द्र कुमार महाजन (वय ४५, रा. जय मातादी अपार्टमेंट, मोहाडी रोड, आदर्शनगर, जळगाव) यांचा मुलगा गायत्रीनगर, शिरसोली रोड परिसरात सायकल घेऊन गेला होता. काम आटोपून परत आल्यानंतर सायकल गायब असल्याचे लक्षात आले. याबाबत रात्री ९.०४ वाजता अज्ञात चोरट्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुप्त माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. २८ मे रोजी पहाटे १.१५ वाजता पिंप्राळा येथील मयुर कॉलनीत सापळा रचून जयेश अशोक राजपूत (वय १९, रा. मयुर कॉलनी, पिंप्राळा, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याच्याकडून दोन सायकली जप्त करण्यात आल्या:
NEW SPEED MSFSDDMW कंपनीची लाल रंगाची सायकल (किंमत अंदाजे ११ हजार रुपये), HUGE (27.5) कंपनीची एम-सिल्वर रंगाची सायकल (किंमत अंदाजे १५ हजार रुपये) या गुन्ह्याचा एकूण २६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोउपनि राहुल तायडे, पोउपनि चंद्रकांत झनके, पोना विकास सातदिवे, योगेश बारी, पोकॉ मंदार महाजन व इज्जाईल खाटील यांनी सहभाग घेतला. सध्या या प्रकरणाचा तपास पोना विकास सातदिवे करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा