Top News

जळगाव हादरलं : कबुतर पकडायला गेलेला १६ वर्षीय अरबाज बेपत्ता; २१ दिवसांनी मृतावस्थेत सापडला

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी – “मुलगा मुंबईला गेला असावा” या आशेवर शोध घेत असलेल्या एका आईला मोठा धक्का बसला, जेव्हा तिच्या १६ वर्षीय मुलाचा मृतदेह तब्बल २१ दिवसांनंतर जळगावमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीच्या छतावर कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. अरबाज शेख (वय १६, रा. मास्टर कॉलनी) असं मृत मुलाचं नाव आहे. बुधवारी, २८ मे रोजी सकाळी १० वाजता हा मृतदेह वायरींमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला. प्राथमिक तपासात त्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

८ मेपासून बेपत्ता – अपहरणाची तक्रार
अरबाज आपल्या आजी-आजोबा आणि आईसोबत मास्टर कॉलनीत राहत होता. ८ मे रोजी तो कबुतर पकडण्यासाठी घरातून बाहेर पडला, परंतु रात्री उशिरापर्यंत तो घरी परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी आईने परिसरात शोध घेतला; मात्र काहीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे तिने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुलाला कुणीतरी फूस लावून पळवून नेलं असावं, असा संशय व्यक्त करत अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

कुजलेला मृतदेह, उग्र वासातून उलगडा
२८ मे रोजी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका इमारतीच्या छतावर पाण्याची टाकी तपासण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला तीव्र दुर्गंधी जाणवली. त्याने परिसरात शोध घेतला असता, केबल वायरींमध्ये अडकलेला कुजलेला मृतदेह दिसून आला. तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.

शर्टावरून नातवाची ओळख
मृतदेह ओळखण्यास कठीण असतानाही, अरबाजच्या आजोबांनी त्याच्या अंगावरच्या शर्टावरून मृतदेह अरबाजचाच असल्याची पुष्टी केली. त्यानंतर नातेवाईकांनीही ओळख पटवली. रुग्णालयात मृतदेह आल्यानंतर परिसरातील नातेवाईक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली. या घटनेमुळे जळगावमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

विजेचा शॉक की काहीतरी वेगळं?
घटनास्थळी असलेल्या वायरींच्या अवस्थेवरून आणि मृतदेहाच्या जागेवरून हे अपघाती मृत्यू आहे की अन्य कोणतीही बाब आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मृतदेहाची स्थिती पाहता त्याच्या मृत्यूला १५-२० दिवस झाले असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नेमकी कारणमीमांसा होऊ शकेल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने