Top News

जळगावमध्ये आरोग्य व्यवस्थेचे पोलखोल: बोरमळी गावातील महिलेची रस्त्यातच प्रसूती


चोपडा तालुक्यातील गंभीर घटना; दोन तास रस्त्यावर मदतीची वाट पाहत राहिली महिला, महिलांनीच केली प्रसूतीसाठी मदत

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बोरमळी गावात २१ मे रोजी आरोग्य व्यवस्थेच्या गलथानपणाचे जिवंत उदाहरण घडले. संताबाई बारेला या गर्भवती महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाली. धक्कादायक बाब म्हणजे, वेळेवर अँब्युलन्स न मिळाल्यामुळे ही प्रसूती दुचाकीवरून रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच झाली. इतकेच नव्हे, तर प्रसूतीनंतरही तब्बल दोन तास अँब्युलन्स मिळाली नाही. या दरम्यान रस्त्यावरच्या महिलांनी प्रसूतीसाठी तातडीने मदत केली.

संताबाई यांच्या पतीने अँब्युलन्स मिळवण्यासाठी प्रशासनाशी संपर्क साधण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र कुठूनही तत्काळ मदत मिळाली नाही. शेवटी, त्यांनी पत्नीला दुचाकीवरून जवळच्या आरोग्य केंद्रात नेत असताना मार्गामध्येच संताबाईंना प्रसववेदना सुरू झाल्या आणि त्या ठिकाणीच बाळंतपण घडले.

ही घटना समोर आल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत, "ही केवळ निष्काळजीपणाची बाब नाही, तर एका महिलेच्या जिवाशी खेळ आहे. संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी व संताबाई यांना तातडीने आर्थिक आणि वैद्यकीय मदत द्यावी," अशी मागणी केली आहे.

या घटनेने ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था किती दुर्लक्षित आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. अँब्युलन्स वेळेवर मिळाली असती, तर संताबाई यांना व त्यांच्या बाळाला अधिक सुरक्षित आणि सन्माननीय प्रसूती मिळू शकली असती. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने