Top News

पिंपळगाव गोलाईतजवळ लक्झरी बसचा भीषण अपघात; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला


जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I जिल्ह्यातील अपघातांच्या घटनांमध्ये सातत्य असतानाच, आज दिनांक २७ मे रोजी सकाळी सुमारास एक भीषण घटना घडली. पुण्याहून मध्यप्रदेशाकडे जात असलेली खासगी लक्झरी बस (क्रमांक MP 48 ZF 5533) औरंगाबाद मार्गे जात असताना पहूर-पाळधी रस्त्यावरील पिंपळगाव गोलाईत गावाजवळ अचानक बसला आग लागली.

अंदाजानुसार, बसच्या मागील टायरमध्ये ताप निर्माण झाल्याने ही आग लागली असावी. घटनास्थळी उपस्थित प्रवाशांनी आरडाओरड केल्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखत तातडीने बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना त्यांच्या सामानासह खाली उतरवले. काही क्षणांतच संपूर्ण बसने पेट घेतला. यावेळी जोरदार वाऱ्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आणि प्रवाशांमध्ये घबराट उडाली.

बसमध्ये महिला, मुले, युवक आणि वृद्ध अशा मिळून सुमारे ३० ते ३५ प्रवासी होते. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालक आणि वाहकासह सर्व प्रवासी सुखरूप असल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने जामनेर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन गाडीने घटनास्थळी धाव घेतली आणि अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यानंतर शेंदुर्णी येथील अग्निशमन दलही मदतीसाठी दाखल झाले.

या घटनेमुळे पहूर-जामनेर मार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली होती. पहूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी, पिंपळगाव गोलाईतचे सरपंच आणि स्थानिक ग्रामस्थांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात व वाहतूक सुरळीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण मदत केली.

ही घटना केवळ चालकाच्या सतर्कतेमुळे मोठ्या जीवितहानीपासून वाचली आहे, असे स्थानिकांकडून सांगण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने