Top News

जळगावातील मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी उपाहारगृहांतील मांस विक्रीवर बंदीची मागणी


जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले असून, या कुत्र्यांचे आक्रमक वर्तन, मुलांवर हल्ले आणि रस्त्यावर अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. याला कारणीभूत ठरणाऱ्या उपाहारगृहांमधून होणाऱ्या मांस विक्रीवर कारवाई करण्याची मागणी उत्तर भारतीय ब्राह्मण संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

उत्तर भारतीय ब्राह्मण संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव महापालिकेला सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उपाहारगृहांमधून मांस बाहेर फेकल्यामुळे मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असून, त्यांचा वावर शहरात दिवसेंदिवस धोकादायक होत आहे. मागील तीन ते चार महिन्यांमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, या समस्येवर प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करावी, अशी संघाची जोरदार मागणी आहे.

निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, काही उपाहारगृहांमध्ये मांस विक्री FSSAIच्या नियमाविरोधात होत आहे. स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, व अपशिष्ट पदार्थांच्या योग्य विल्हेवाटीबाबत नियमांचे पालन न करता खुलेआम मांस विक्री केली जात आहे. या उपाहारगृहांची तपासणी करून, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि तत्काळ मांस विक्री बंद करण्यात यावी, अशी संघटनेची भूमिका आहे.

विशेष म्हणजे, संघाच्या शिष्टमंडळाने जळगाव शहर महापालिकेचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) यांना भेट देऊन निवेदन सादर केले असून, यामध्ये शंकर मिश्रा, पंकज दुबे, राहूल उपाध्याय यांची स्वाक्षरी आहे.

शहरातील स्वच्छता, नागरिकांची सुरक्षितता आणि कायद्याचे पालन यासंबंधी महापालिकेने लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करत संघटनेने इशारा दिला आहे की, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने