जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची पत्रकार परिषदेत माहिती
जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I तालुक्यातील एका उपकेंद्रात गरोदर महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याच्या गंभीर प्रकाराची चौकशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात प्राथमिक चौकशीत काही त्रुटी आढळून आल्याचे सीईओंनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
विशेष चौकशी समिती गठीत
घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने एक विशेष चौकशी समिती स्थापन केली आहे. समितीच्या अध्यक्षपदी एक वरिष्ठ अधिकारी, तर सदस्य म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी व अतिरिक्त सिव्हिल सर्जन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीला ३१ तारखेपर्यंत संपूर्ण घटनेचा तपशीलवार अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या दिवशी उपकेंद्रात नेमके काय घडले, कोणती सेवा दिली गेली किंवा नाकारली गेली – याचा सखोल तपास केला जाणार आहे.
आरोग्य सेवा सुधारण्यासाठी तातडीचे निर्णय
घटनेनंतर आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रशासनाने काही तातडीचे निर्णय घेतले आहेत. उपकेंद्रापर्यंत पोहोचण्यास अडचण येऊ नये यासाठी त्या ठिकाणी कायमस्वरूपी वाहन (ॲम्बुलन्स) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे.
तसेच, स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार आरोग्य सेवक (MOS) व ॲम्बुलन्स चालक यांचे वास्तव्य संबंधित परिसरातच ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आपत्कालीन प्रसंगी तत्काळ सेवा मिळणे शक्य होईल.
जवाबदारांवर होणार कठोर कारवाई
या प्रकरणात दोषी आढळलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. हेतुपुरस्सर दुर्लक्ष, अकार्यक्षमता किंवा सेवेत झालेली चूक आढळल्यास संबंधितांवर निलंबन किंवा अन्य शिस्तभंगात्मक उपाययोजना करण्यात येणार असल्याचा इशारा सीईओंनी दिला आहे.
“माहेरघर” योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
पत्रकार परिषदेत बोलताना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी “माहेरघर” या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन सर्व गरोदर महिलांना व त्यांच्या कुटुंबीयांना केले. या योजनेअंतर्गत डिलिव्हरीपूर्वी ८ ते १० दिवस अगोदर पीएचसीमध्ये राहण्याची व्यवस्था असून, महिलेसह तिच्या पतीला राहण्याची, जेवणाची आणि मजुरीची सुविधा दिली जाते.
गावातील आशा व अंगणवाडी सेविकांनी या योजनेबाबत प्रभावी जनजागृती करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. काही महिलांमध्ये असलेली भीती किंवा गैरसमज दूर करून त्या योजना आत्मीयतेने स्वीकारतील, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
प्राथमिक माहिती : नवरा-बायको उपकेंद्रात उपस्थित
चालू चौकशीत समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला व तिचा पती उपकेंद्रात वेळेवर उपस्थित होते. मात्र, तिथे कोणती सेवा दिली गेली किंवा नाकारण्यात आली – याबाबत साशंकता असल्याने चौकशी समिती त्या दिवशीच्या घटनाक्रमाचा सविस्तर तपास करत आहे.
प्रशासनाची स्पष्ट भूमिका : पारदर्शक चौकशी व जबाबदारांवर कारवाई
जिल्हा परिषदेचे लक्ष या प्रकरणावर असून, चौकशी पारदर्शकपणे व वेळेत पूर्ण करून जबाबदारांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा