Top News

४५ वर्षीय महिलेची छताला गळफास लावून घेत आत्महत्या

जळगाव शहरातील देवेंद्र नगर येथील घटना

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील महाबळ परिसरातील देवेंद्र नगर येथे एका महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी (२५ मे) दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयत महिलेचे नाव शबाना जावेद तडवी (वय ४५, रा. देवेंद्र नगर, संत गाडगेबाबा चौक, महाबळ) असे आहे. त्यांचा एक मुलगा व एक मुलगी असा परिवार असून, मुलगा नुकताच सरकारी नोकरीत रुजू झाला आहे तर मुलगी शिक्षण घेत आहे.

शबाना तडवी या आपल्या दुमजली घराच्या वरच्या मजल्यावर राहत होत्या. रविवारी दुपारी त्यांनी मुलीला “कपडे बदलून येते” असे सांगून दुसऱ्या खोलीत गेल्या. काही वेळात त्यांनी दोरीच्या सहाय्याने छताला गळफास लावून जीवन संपवले.

कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर रुग्णालयात नातेवाईकांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. नातेवाईक व परिचितांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

या प्रकरणाचा पुढील तपास रामानंद नगर पोलीस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने