Top News

जुन्या वादातून टोल नाक्यावर तुफान हाणामारी, तर दुसरीकडे आगीत झोपडी खाक

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I पारोळा तालुक्यातील सब गव्हाण टोल नाक्यावर जुन्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत दोन्ही गटांतील आठ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या धुळे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी एक दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला होता. त्याच वादाचे पर्यवसान काल तुफानी हाणामारीत झाले. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येते की, दोन्ही गटातील व्यक्ती एकमेकांवर दगडफेक करत आहेत तसेच लाथा-बुक्क्यांनी आणि लाठ्याकाठ्यांनी एकमेकांवर तुटून पडत आहेत. काही व्यक्ती जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले असतानाही त्यांच्यावर बेदम मारहाण सुरू असल्याचे दिसत आहे.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून नशिराबाद टोळीतील दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सुरू आहे.

बोदर्डे (अमळनेर तालुका): दुसरीकडे, अमळनेर तालुक्यातील बोदर्डे गावात २६ मे रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास काशीनाथ दिलभर भिल यांच्या झोपडीला अचानक भीषण आग लागली. या आगीत त्यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले असून, घरातील संसारोपयोगी वस्तू, धान्य, कपडे, रोख रक्कम, दूरदर्शन संच तसेच महत्त्वाची कागदपत्रेही राख झाली आहेत.

काशीनाथ भिल हे अत्यंत गरिबीत कष्ट करून आपला उदरनिर्वाह करत होते. मात्र, या दुर्घटनेमुळे त्यांचे सर्वस्व हिरावले गेले असून, सध्या त्यांच्या कुटुंबासमोर उपासमारीचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यांच्याकडे आता निवाऱ्यासाठीही काहीच उरलेले नाही. प्रशासनाने या कुटुंबाला तात्काळ मदतीचा हात द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

या दोन्ही घटनांनी स्थानिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन व पोलिसांकडून तात्काळ कारवाई आणि मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने