जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I भुसावळहून नंदुरबारकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावर मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना बुधवारी (१५ मे) दुपारी दोनच्या सुमारास प्रताप महाविद्यालयाजवळ घडली. या दुर्घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही असून मालगाडीचा लोको पायलट आणि गार्ड सुरक्षित आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडीचे काही डबे रुळावरून खाली उतरल्याने आजूबाजूचे इतर ट्रॅक देखील खराब झाले आहेत. परिणामी, सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णतः ठप्प करण्यात आली आहे. यामुळे प्रवासी रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
घटना स्टेशनपासून काही अंतरावरच घडल्याने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव व दुरुस्ती कार्य सुरू केले. मात्र, नेमका अपघात कसा झाला, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. रेल्वे अधिकाऱ्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला असून अपघाताची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, या दुर्घटनेमुळे परिसरातील नागरिक व प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दुरुस्तीचे काम किती वेळात पूर्ण होणार आणि वाहतूक पूर्वपदावर कधी येणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा