Top News

बांधकाम कामगार ‘भांडी योजने’त दलालांचा सुळसुळाट; गरजू कामगार वंचित


२ हजारात सामान्य नागरिकांचे बांधकाम कामगार म्हणून कार्ड तयार; अपात्रांना लाभ, पात्रांना हुलकावणी

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या भांडी योजनेत सध्या मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून येत असून मूळ बांधकाम कामगारांना लाभ न मिळता अपात्र व्यक्ती या योजनेचा लाभ घेत असल्याचे उघड झाले आहे. दलालांच्या माध्यमातून फक्त दोन हजार रुपयांत सर्वसामान्य नागरिकांचे बांधकाम कामगार म्हणून कार्ड बनवले जात असून, यामुळे खऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय होतो आहे.

या योजनेत पात्र बांधकाम कामगारांना स्वयंपाकासाठी आवश्यक ३० वस्तूंनी भरलेला भांडी सेट मोफत दिला जातो. मात्र शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अशा व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेतला आहे, ज्यांना ना बांधकामाशी संबंध आहे ना गरज. यामुळे गरजूंना लाभ मिळण्याऐवजी अपात्र लाभार्थ्यांची संख्या वाढली आहे.

जळगाव शहरात आणि परिसरात दलालांचे नेटवर्क सक्रिय झाले असून ते दोन हजार रुपये आकारून बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम कामगाराचे ओळखपत्र बनवून देत आहेत. हे कार्ड मिळाल्यानंतर संबंधितांना भांडी योजनेसारख्या शासकीय लाभ मिळवता येतात.

विशेष म्हणजे, कामगार कल्याण कार्यालय आणि सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय याकडे सातत्याने होणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने या गैरप्रकारांना अधिक चालना मिळत आहे. खरे बांधकाम कामगार लाभापासून वंचित राहत असून दलालांचे फावते आहे.

‘सखोल चौकशी व कठोर कारवाईची गरज’
ही संपूर्ण प्रक्रिया पाहता शासकीय योजनेचा उद्देशच भरकटला आहे. गरजूंना लाभ मिळावा यासाठी पात्रतेची काटेकोर छाननी करणे, दलालांवर कठोर कारवाई करणे, आणि कामगार कल्याण कार्यालयाची जबाबदारी निश्‍चित करणे आवश्यक बनले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने