Top News

जळगावात वाळू चोरीचा सुळसुळाट; महसूल प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?


मध्यरात्री गिरणेकाठी सुरू असलेला वाळूचा काळाबाजार शहरात अपघातांना आमंत्रण

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहराच्या परिसरात रात्रीच्या वेळी गिरणा नदीच्या काठावरून विना नंबरच्या वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू असल्याचे समोर आले आहे. ही वाळू शहरातील विविध भागात साठवली जात असून, अनेक ठिकाणी बांधकामांसाठी वापरली जात आहे. विशेष म्हणजे, जळगाव महसूल प्रशासनाकडून या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांमधून जोर धरू लागला आहे.

शहरातील आकाशवाणी चौक, रामानंद नगर, जिजामाता नगर, एमआयडीसी परिसर यांसारख्या भागात मध्यरात्रीच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणारे शेकडो डंपर सहज दिसून येतात. मात्र, महसूल विभाग किंवा वाहतूक पोलिसांकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने या गोरखधंद्याला खुलेआम उत्तेजन मिळत आहे.

जळगाव जिल्ह्यात शासनाच्या अधिकृत वाळू घाटांची माहिती असूनही, शहरात चालणाऱ्या बांधकामांसाठी वाळू कशी उपलब्ध होते, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बांधकाम व्यावसायिकांना ही वाळू कुठून आणि कशा मार्गाने मिळते, याची चौकशी केली गेली पाहिजे. अन्यथा महसूल प्रशासन, तहसीलदार आणि तलाठी यांचे या अवैध व्यवहारांतील सहभाग किंवा दुर्लक्ष संशयास्पद वाटतो.

या अवैध वाळू वाहतुकीमुळे शहरातील रस्त्यांवर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. रात्रीच्या वेळी बिनधास्तपणे भरधाव वेगाने जाणारे डंपर नागरिकांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका बनले आहेत.

या सर्व परिस्थितीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि जळगाव शहरातील वाळू माफियांवर नियंत्रण आणावे, अशी मागणी आता जनतेतून होऊ लागली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने