Top News

बालकांमध्ये मधुमेहाचे वाढते प्रमाण चिंतेची बाब; आहार, आरोग्य जनजागृतीसाठी जिल्हा परिषद व वील ग्लोबल फाउंडेशनचा करार


जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I जळगाव जिल्ह्यातील बालकांमध्ये वाढत्या प्रमाणावर आढळणाऱ्या मधुमेहाच्या प्राथमिक लक्षणांमुळे चिंता व्यक्त होत असून, याबाबत आहार आणि आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेने वील ग्लोबल फाउंडेशन या नामवंत संस्थेशी करार केला आहे. बुधवारी आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ही माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली.

धरणगाव तालुक्यातील पिंपरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची अलीकडेच प्रायोगिक तत्त्वावर आरोग्य तपासणी करण्यात आली होती. या तपासणीमध्ये सुमारे 55 ते 60 विद्यार्थ्यांमध्ये मधुमेहाची प्राथमिक लक्षणे आढळून आली. बदलती जीवनशैली, आहारातील असमतोल आणि जंक फूडचे वाढते सेवन हे यामागील प्रमुख कारणे असल्याचे स्पष्ट झाले.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने संपूर्ण जिल्हाभरात शाळांमध्ये आणि नागरिकांमध्ये आहार व आरोग्य विषयक जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वील ग्लोबल फाउंडेशनच्या सहकार्याने ही विशेष जनजागृती मोहीम राबवली जाणार असून, शाळा सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत विद्यार्थ्यांच्या रक्त तपासणीची मोहीम देखील हाती घेण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, तसेच धरणगावचे तालुका आरोग्य अधिकारी संजय चव्हाण हे उपस्थित होते. ही मोहीम केवळ बालकांच्या आरोग्यासाठी नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने