Top News

मोठी बातमी : सख्या शालकाच्या ५३ लाखांच्या विम्यासाठी निर्घृण खून


जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I पारोळा तालुक्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कापूस व्यापाऱ्याने आपल्या सख्या शालकाच्या नावावर ५३ लाख रुपयांच्या विमा पॉलिसी घेतल्या आणि त्या रकमेवर डोळा ठेवून त्याचा निर्घृण खून करून अपघाताचा बनाव केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांच्या अत्यंत शिताफीने केलेल्या तपासामुळे अवघ्या दहा दिवसांत हा गुन्हा उकलत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील शेवगे येथील रहिवासी संदीप भालचंद्र पाटील याने आपल्या सख्या शालक समाधान शिवाजी पाटील (रा. फागणे, ता. साक्री, जि. धुळे) यांच्या नावावर एलआयसीच्या तीन आणि खासगी विमा कंपन्यांच्या दोन अशा एकूण पाच पॉलिसी घेतल्या होत्या. या पॉलिसींची एकूण विमारक्कम ५३ लाख रुपये इतकी होती. समाधान हा अपंग व व्यसनाधीन असल्याचा गैरफायदा घेत संदीपने त्याच्या पत्नीला वारसदार ठरवून हा घातकी कट रचला.

खुनाचा कट, अपघाताचा बनाव

१७ एप्रिल रोजी रात्री संदीप आणि त्याचा आतेभाऊ चंद्रदीप आधार पाटील (रा. खवशी, ता. अमळनेर) यांनी समाधान पाटीलला स्कुटीवरून घेऊन धुळे-पारोळा महामार्गावर नेले. तेथे अंधाराचा फायदा घेत लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर घाव घालून त्याचा जागीच खून केला. त्यानंतर घटनास्थळी अपघाताचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

पोलीस तपासात गूढ उलगडलं

संदीप पाटीलने रात्री १०.३० वाजता पोलिसांना अपघाताची माहिती दिली. मात्र, पोलिस निरीक्षक सुनील पवार आणि उपनिरीक्षक अमरसिंग वसावे यांच्यासह पथकाने घटनास्थळी पोहोचल्यावर मृताच्या डोक्यातून आलेले रक्त काही अंतरावर सापडल्याने अपघाताचा संशय गडद झाला. यानंतर पोलिसांनी शंका घेऊन सखोल चौकशी सुरू केली.

तपासादरम्यान संदीपने अनेक वेळा उलटसुलट जबाब दिले. त्याच्या मोबाईलचा सीडीआर तपासण्यात आला असता, तो घटनास्थळी उपस्थित होता, हे स्पष्ट झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले आणि महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. पोलिसांनी संदीप आणि चंद्रदीप या दोघांना अटक केली असून चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

वाहन सुस्थितीत आढळल्याने संशय अधिक गडद

अपघातस्थळी स्कुटी पूर्णपणे सुस्थितीत आढळून आल्यामुळे पोलिसांचा संशय अधिक दृढ झाला. या प्रकरणाचा तपास डीवायएसपी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या गुन्ह्याचा पर्दाफाश केल्याची माहिती दिली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी केलेल्या तात्काळ आणि सखोल तपासामुळे एक धक्कादायक कट उघडकीस आणण्यात यश आले आहे.  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने