Top News

कोल्हे हिल्स परिसरातील गुंडगिरी बळावली; चायनीज गाडी पलटी, नागरिक भयभीत


गुंडांचा हैदोस; चायनीज गाडी पलटी करून तोडफोड, व्यावसायिकाचं मोठं नुकसान

जळगाव अपडेट न्यूज, प्रतिनिधी I जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील सिद्धिविनायक चौकात अज्ञान गुंडांनी एक चायनीज गाडी पलटी करून गंभीर नुकसान केले. ही घटना शहरातील वाढती गुंडगिरी आणि पोलिस प्रशासनाची अपयशी भूमिका अधोरेखित करत आहे.


सदर घटना रात्री उशिरा घडली असून, परिसरात चायनीज खाद्यगाडी चालवणाऱ्या एका गरीब नागरिकाची गाडी काही अज्ञात गुंडांनी पलटी केली. गाडी मालकाने आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, हे गुंड परिसरातीलच असून यापूर्वी सुद्धा पोलिसांनी त्यांना पकडले होते. मात्र, काही ओळखींच्या आडून त्यांना लगेच सोडण्यात आले, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.


स्थानिक रहिवाशांनुसार, सिद्धिविनायक चौकात सध्या दारू, सट्टा, पत्ता, गुटख्याचे व्यवसाय उघडपणे सुरू आहेत. नागरिकांनी वारंवार तालुका पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे गुन्हेगारांचे मनोबल अधिकच वाढले असून, पोलिसांकडून कोणतीही भीती उरलेली नाही.


केवळ व्यावसायिकांनाच नव्हे तर महिलांनाही या गुंडगिरीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वीच लहान मुलांसाठी सुरू करण्यात आलेले डान्स क्लासेस देखील या गुंडांनी बंद पाडले. त्यांनी तेथे लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडून टाकले, ज्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


सध्या पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरत असून, कारवाई टाळली जात असल्याने नागरिकांमध्ये पोलिसांवरच संशय घेतला जात आहे. "पोलीस काही चिरीमिरी घेऊन गुंडांना मोकळे करत आहेत काय?" असा सवाल नागरिक विचारत आहेत.


या प्रकरणी पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून गुंडगिरीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडण्याची शक्यता आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने