जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जम्मू-काश्मीरमधील पहलगाम या प्रसिद्ध पर्यटनस्थळी हिंदू पर्यटकांची त्यांच्या धार्मिक ओळखीवरून अज्ञात दहशतवाद्यांकडून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेच्या तीव्र निषेधार्थ आज अंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात या घटनेचा तीव्र निषेध करताना देशातील बहुसांस्कृतिक समाज, धार्मिक स्वातंत्र्य व सहिष्णुतेच्या मुल्यांना धक्का पोहचवणारी ही घटना असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे केवळ हिंदू समाजच नव्हे, तर संपूर्ण देश हादरल्याची भावना निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
1. या घटनेतील सर्व आतंकवाद्यांना त्वरीत अटक करून कडक शिक्षा (मृत्युदंड) देण्यात यावी.
2. जम्मू-काश्मीरमधील सर्व धार्मिक स्थळे व पर्यटनस्थळांवर स्थायिक व प्रभावी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करावी.
3. मयतांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत व आधार मिळावा.
4. सर्व धार्मिक स्थळे व यात्रांसाठी एकसंध राष्ट्रीय सुरक्षा धोरण तयार करावे.
5. धर्माच्या आधारे होणाऱ्या हिंसाचारावर कठोर कायदा तयार करावा.
6. देशभरातील मदरशांवर कठोर नियंत्रण ठेवून त्यांच्या कारभाराची चौकशी करावी.
समाजभावनेला दुःखद धक्का – हिंदू परिषदेची भूमिका
निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की ही घटना केवळ पीडित कुटुंबांची वेदना नसून संपूर्ण हिंदू समाजाच्या आत्म्याला पीडा देणारी आहे. भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी या प्रकरणाची चौकशी करून राष्ट्र सुरक्षा व सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून कठोर पावले उचलण्याचे आवाहन परिषदेकडून करण्यात आले आहे.
यावेळी प्रविण भाऊ कोळी (जळगाव जिल्हा मंत्री, राष्ट्रीय बजरंग दल), राहूलसिंह पवार (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय बजरंग दल), नितीन कोळी (जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रीय बजरंग दल) आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा