Top News

प्रेमविवाहाचा सूड: वडिलांचा थरकाप, लग्नसमारंभात मुलीवर गोळीबार


चोपड्यातील हळदीच्या कार्यक्रमात संतप्त वडिलांकडून गोळीबार; मुलगी ठार, जावई गंभीर जखमी

चोपडा, जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I प्रेमविवाहाचा राग अजूनही न संपल्यामुळे एका संतप्त वडिलांनी आपल्या मुलीच्या लग्नसमारंभात घुसून थेट गोळीबार केला. या भीषण घटनेत मुलगी जागीच ठार झाली असून, तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. चोपडा शहरातील आंबेडकरनगर येथे शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, तृप्ती अविनाश वाघ (वय २४) हिचा दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह अविनाश ईश्वर वाघ (वय २८, दोधे रा. करवंद, शिरपूर, सध्या राहणार कोथरूड, पुणे) याच्याशी झाला होता. मात्र, तृप्तीच्या वडिलांना - किरण अर्जुन मंगले (वय ४८, रा. शिरपूर, जिल्हा धुळे) हा विवाह मान्य नव्हता.
शनिवारी, अविनाशच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी तृप्ती व अविनाश चोपड्यात आले होते. कार्यक्रम संपताच किरण मंगले यांनी अचानक कार्यक्रमस्थळी येत आपल्या रिव्हॉल्वरमधून तृप्तीवर गोळीबार केला.
तृप्तीवर गोळ्या झाडल्यावर तिचा पती अविनाश तिला वाचवण्यासाठी पुढे सरसावला, परंतु त्यालाही पाठ व हातावर गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

गोळीबारानंतर उपस्थित नातेवाईक व वऱ्हाडी यांनी संतप्त होऊन किरण मंगले यांच्यावर हल्ला चढवला आणि त्यांना जोरदार मारहाण केली. यामध्ये किरण मंगले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेही यांनी चोपड्यात येऊन घटनास्थळाची पाहणी केली. पोलीसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

तृप्ती व अविनाश यांचा दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला असला तरी वडिलांच्या मनात त्याबाबत प्रचंड राग व द्वेष होता. त्यातूनच हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने