दिवसाही लोडशेडिंग, रात्री लाईटची कमी व्होल्टेज – नागरिकांची झोप उडाली; तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरात राहणाऱ्या नागरिकांना महावितरणच्या भोंगळ कारभाराचा मोठा फटका बसत आहे. येथील नागरिक वेळेवर आणि पूर्णपणे लाईटबिल भरत असूनही, त्यांना सतत लोडशेडिंग व कमी व्होल्टेजच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
दिवसाच्या वेळेत अनेक तास लोडशेडिंग होत असून रात्रीच्या वेळी लाईट जरी असली, तरी ती कमी व्होल्टेजमुळे उपकरणे नीट चालत नाहीत. यामुळे फ्रीज, कूलर, पंखे, टीव्ही यांसारखी उपकरणे बंद पडत असून, नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
या परिस्थितीमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. काही रहिवाशांनी सांगितले की, "आम्ही नियमितपणे लाईटबिल भरत आहोत, तरीही महावितरणच्या दुर्लक्षामुळे आमचे हाल होत आहेत. लहान मुलं, वृद्ध आणि आजारी लोकांचे हाल होत आहेत. हे अत्यंत अन्यायकारक आहे."
महावितरणकडे तक्रार केली असता, नेहमीप्रमाणे "लाइनमध्ये समस्या आहे, लवकरच दुरुस्ती केली जाईल" असे उत्तर मिळते. मात्र, प्रत्यक्षात कोणतीच ठोस कारवाई होताना दिसत नाही.
नागरिकांनी आता सामूहिकपणे आवाज उठवण्यास सुरुवात केली असून, जर लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागला नाही, तर आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. स्थानिक प्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे, अन्यथा नागरिकांमध्ये असंतोष आणखी वाढण्याची शक्यता आहे.
टिप्पणी पोस्ट करा