दिवसा लोडशेडिंग, रात्री कमी व्होल्टेजचा त्रास; संतप्त नागरिकांनी व्यक्त केला रोष
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील कोल्हे हिल्स, ओम साई नगर, नवनाथ नगर, लक्ष्मी नगर, श्री साई धाम मंदिर परिसर, न्यू लक्ष्मी नगरसह संपूर्ण वाघ नगर परिसरातील नागरिक सध्या महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे हैराण झाले आहेत. नागरिकांनी नियमितपणे व संपूर्ण वीजबिल भरले असतानाही, त्यांना सतत लोडशेडिंग व रात्रीच्या वेळेस कमी व्होल्टेजचा सामना करावा लागत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात तापमान प्रचंड वाढले असून, अशा वेळी वीजपुरवठा खंडित होणे किंवा व्होल्टेज कमी असणे ही गंभीर बाब मानली जात आहे. दिवसभरात अनेक वेळा लाईट जात असून, रात्रीच्या वेळी पंखे, फ्रिज, कूलर अशा घरगुती उपकरणांवर याचा विपरित परिणाम होत आहे. परिणामी, नागरिकांची झोपेची गुणवत्ता देखील ढासळली आहे.
कोल्हे हिल्स परिसरातील रहिवाशांनी यासंदर्भात महावितरण कार्यालयात तक्रारी नोंदवल्या असूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. अनेक नागरिकांनी सोशल मीडियावरून आपला संताप व्यक्त केला आहे व महावितरणला जाब विचारला आहे.
स्थानिक रहिवासी म्हणाले, "आम्ही वेळेवर लाईटबिल भरतो, तरीसुद्धा आमच्यावर असा अन्याय का? महावितरणकडून कुठलाही शेड्युल नाही, ना कुठली पूर्वसूचना. हे खपवून घेणार नाही."
या समस्येबाबत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरीत लक्ष घालून योग्य तो वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देखील काही नागरिकांनी दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा