Top News

गिरणा नदीच्या काठावर सापडला एका इसमाचा सांगाडा; जळगाव तालुक्यात खळबळ

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I आमोदा बुद्रुक गावात शनिवारी (दि. १९ एप्रिल) सायंकाळी सातच्या सुमारास गिरणा नदीच्या किनारी एका पुरुष जातीच्या व्यक्तीचा सांगाडा आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून, जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गावचे पोलीस पाटील यांना स्थानिक ग्रामस्थांनी नदीकिनारी एक सांगाडा असल्याची माहिती दिली. त्यांनी ही माहिती तत्काळ जळगाव तालुका पोलीस स्टेशनला कळवली. पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अहिरे व हेकॉ किरण आगोणे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. घटनास्थळीच मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनला पाचारण करण्यात आले. फॉरेन्सिक पथकाने सांगाड्यावरून डीएनएसाठी आवश्यक नमुने गोळा करून ते सुरक्षित केले आहेत.

सध्या सांगाडा अधिक तपासासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. प्राथमिक तपासात सांगाडा सुमारे ६० ते ६५ वयोगटातील पुरुषाचा असल्याचे समोर आले आहे. सांगाड्याचे डोके, छातीचा भाग, एक हात व एक पाय आढळले आहेत. घटनास्थळी काही कपड्यांचे तुकडेही मिळून आले आहेत. या सगळ्या पुराव्यांच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.

या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नेमकी ही व्यक्ती कोण होती, तिचा मृत्यू कसा झाला, हे आत्महत्या आहे की घातपात, याचा शोध घेण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत. जळगाव तालुका पोलीस स्टेशनकडून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने