जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव आर्थिक गुन्हे शाखेने शहरातील मोठ्या जमीन फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. एका बांधकाम व्यावसायिकाची तब्बल १ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणात मुख्य संशयित मनोज लिलाधर वाणी याला अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी सुनील मधुकर चौधरी (रा. चिंतामणी नगर, धरणगाव) यांनी दिनांक ३ फेब्रुवारी २०२५ रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीनुसार, दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी मनोज वाणी आणि शैलेंद्र भिरुड यांनी महानगरपालिकेच्या हद्दीतील सि.स.नं. २११२/६०, क्षेत्रफळ ५५७ चौ. मीटर या जमिनीवरील जुने बांधकाम दाखवून खरेदीसाठी सौदा पावती सादर केली. त्यानंतर, १५ मे २०२३ रोजी नोटरी करारनामाही करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात जुने बांधकाम हस्तांतरीत न करता चौधरी यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणात मनोज वाणी, कल्पना वाणी, शैलेंद्र भिरुड, हेमलता ऊर्फ तनुजा भिरुड, तीलोतमा इंगळे, दिपक इंगळे, संदीप पाटील, राजेंद्र सावदेकर, शेखर भिरुड, शिरीष भिरुड, नरेंद्रकुमार भिरुड, ज्ञानेश्वर भिरुड आणि गौरव भिरूड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्व संशयित एकमेकांचे नातेवाईक असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्यांनी संगनमताने बनावट दस्तऐवजाच्या आधारे करार करून मोठ्या रकमेची उचल केली. एवढेच नाही तर, व्यवहार पूर्ण करण्यासाठी चौधरी यांना जिवे मारण्याची धमकीही दिल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणाचा सखोल तपास आर्थिक गुन्हे शाखेने सुरू ठेवला असून, अन्य आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.
टिप्पणी पोस्ट करा