जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I भरारी फाउंडेशन व क्रेडाई जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भूजल पुनर्भरण अभियानाचा शुभारंभ रविवारी मोठ्या उत्साहात करण्यात आला. दि. २८ एप्रिल ते २० जून या कालावधीत दोन महिने चालणाऱ्या या अभियानाचा हा सलग १२वा वर्ष आहे.
या अभियानाच्या माध्यमातून जळगाव शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंगची आवश्यकता पटवून देण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. विशेषतः पावसाळ्यात घराच्या छतावरील पाणी जमिनीत मुरविण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान व उपाययोजनांची माहिती चित्ररथाच्या माध्यमातून विविध ठिकाणी पोहोचवली जाणार आहे.
चित्ररथाचे काव्यरत्नावली चौकात उद्घाटन
रविवारी सायंकाळी काव्यरत्नावली चौकात आयोजित कार्यक्रमात आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून अभियानाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी, "शहरातील सर्व मोकळ्या पटांगणात पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी शोष खड्डे तयार करण्यात येतील व त्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींसाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू," असे आश्वासन दिले.
क्रेडाईचे आवाहन
क्रेडाईचे प्रमुख अनिश शहा यांनी सर्व नवीन बांधकाम प्रकल्पांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविण्यास नागरिकांना प्रोत्साहित करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी भूजल पुनर्भरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा नागरिकांना "जलरत्न" सन्मान देण्यात आला.
"जलरत्न" पुरस्काराने सन्मानित नागरिक
रवींद्र लढ्ढा, नरेंद्र चौधरी, लखीचंद जैन, जितेंद्र चौहान, प्रदीप अहिरराव, शंतनू चौधरी, मनीषा पाटील, शुभश्री दप्तरी, निलेश झोपे व रोहिणी देशमुख यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
दोन महिने जनजागृती मोहीम
या दोन महिन्यांच्या अभियानात रेन वॉटर हार्वेस्टिंग, पावसाळी पाण्याचा योग्य वापर यावर आधारित लघुपट स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उपस्थित मान्यवर
या कार्यक्रमाला आमदार सुरेश भोळे, क्रेडाईचे अनिश शहा, डॉ. पी. आर. चौधरी, धनंजय जकातदार, अनिल कांकरिया, रवींद्र लढ्ढा, दीपक सराफ, आदर्श कोठारी, चित्रा चौधरी, सपन झुनझुनवाला, अनिल भोकरे, अमर कुकरेजा, विजय वाणी, सेवानिवृत्त सहायक वनसंरक्षक एस. आर. पाटील, प्रवीण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक परदेशी यांनी तर आभार दीपक सराफ यांनी मानले. यशस्वी आयोजनासाठी अक्षय सोनवणे, सागर पगारिया, निर्णय चौधरी, सागर परदेशी, निलेश पाटील व रोहिणी मोरडिया यांनी मोलाचे योगदान दिले.
टिप्पणी पोस्ट करा