२०२३-२०२४ चे आरोग्यदूत पुरस्कार जाहीर : ६ जणांचा गौरव
जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I मल्हार च्या लाईफ इज ब्युटीफुल फाऊंडेशन द्वारे दरवर्षी हेल्प फेअर अंतर्गत दिला जाणारा प्रतिष्ठित 'आरोग्यदूत पुरस्कार' २०२३-२०२४ साठी जाहीर झाला आहे. यावर्षी हा सन्मान उमेश बेंडवाल, गौतम सोये, सोनू चिरवडे, सुंदराबाई आहिरे, दीपाली भालेराव आणि बबलू गायकवाड यांना प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून जळगाव शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात येतो.
सन्मान आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम या पुरस्कारांतर्गत प्रत्येक पुरस्कारार्थीला स्मृतिचिन्ह आणि रोख पारितोषिक रु. ५०००/- प्रदान करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक विजेत्याची कार्यगाथा चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहे. यावर्षीचा पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार, दि. ४ एप्रिल २०२५ रोजी सरदार वल्लभभाई पटेल सभागृह (लेवा भवन) येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम सकाळी १२ ते दुपारी १ या वेळेत पार पडणार असून, जळगाव शहर महानगरपालिका आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम साजरा होणार आहे.
महानगरपालिकेच्या कायमस्वरूपी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वर्षभरातील कार्याची पाहणी करून आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने निवड प्रक्रिया पूर्ण केली जाते. यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग असतो. मल्हार कम्युनिकेशन्स, जळगाव हे कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन करते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक श्री. सिद्धार्थ बाफना यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी विशेष स्नेहभोजन पुरस्कार वितरणासोबतच जळगाव महानगरपालिकेच्या सर्व कायमस्वरूपी स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्यास सन्मानपत्र वितरित करण्यात येणार आहे. हा उपक्रम स्वच्छता क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मल्हार कम्युनिकेशन्सचे शाम पवार, कृष्णा भोई, साजिद खान, चारुदत्त मल्हारा, निखिल शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले. हेल्प फेअर टीमच्या सदस्यांमध्ये भरत अमळकर, प्रकाश चौबे, गनी मेमन, नंदू अडवाणी, अमर कुकरेजा, चंद्रशेखर नेवे, प्रशांत मल्हारा आणि आनंद मल्हारा यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वच्छता व आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी वर्गाच्या समर्पणाला सलाम करण्याचा उद्देश आहे.
टिप्पणी पोस्ट करा