Top News

जळगावातील घरफोडी प्रकरणातील दोन सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या

एलसीबीच्या पथकाची कारवाई; २० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील रामनगर परिसरात झालेल्या घरफोडीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने बुधवारी (२ एप्रिल) दुपारी उमर कॉलनी परिसरातून दोन सराईत चोरट्यांना अटक केली. यामध्ये अबरार उर्फ चिरक्या हमीद खाटीक (रा. उमर कॉलनी) आणि समीर उर्फ तात्या शेख सलीम (रा. पिंप्राळा हुडको) यांचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून २० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

घरफोडीप्रकरणी गुन्हा दाखल
रामनगर परिसरातील ऋषीकेश दिलीप येवले यांच्या घरात १५ ते १७ मार्च दरम्यान चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून चोरी केली होती. यावेळी २५ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले होते. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासात उघड झाली गुन्हेगारांची नावे
गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना रेकॉर्डवरील गुन्हेगार अबरार उर्फ चिरक्या खाटीक याने ही चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एलसीबीचे पथक संशयितांचा शोध घेत होते. अबरार हा उमर कॉलनी परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. कसून चौकशीनंतर त्याने साथीदार समीर उर्फ तात्या शेख सलीम याच्यासह चोरी केल्याची कबुली दिली.

२० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत
संशयितांच्या चौकशीत त्यांनी चोरी केलेल्या २५ ग्रॅम सोन्यापैकी २० ग्रॅम सोने अद्याप त्यांच्या ताब्यात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ते हस्तगत केले असून उर्वरित सोन्याचा शोध सुरू आहे.

सराईत गुन्हेगाराला न्यायालयीन कोठडी
संशयित अबरार उर्फ चिरक्या खाटीक याच्याविरुद्ध यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपासासाठी दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई उपनिरीक्षक गणेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार राजेश मेढे, पोलीस हवालदार रवी नरवाडे, अतुल वंजारी, पोलीस नाईक प्रवीण भालेराव, विजय पाटील, हरीलाल पाटील, महेश पाटील, सागर पाटील आणि प्रमोद ठाकूर यांच्या पथकाने केली.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने