Top News

मोठी बातमी I बोगस शिक्षकांवर कारवाई: जळगावातील 51 जणांचे वेतन बंद, घेतलेला पगारही वसूल होणार

3 हजारांहून अधिक शिक्षक बोगस असल्याचा अंदाज, सर्व शाळांची चौकशी करण्याची मागणी

जळगाव अपडेट न्यूज, प्रतिनिधी I जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेत मोठा गैरव्यवहार उघडकीस आला असून, 51 बोगस शिक्षकांवर कारवाई करत त्यांचे वेतन तत्काळ बंद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या शिक्षकांनी आतापर्यंत घेतलेला पगारही शासन वसूल करणार आहे. शिक्षण क्षेत्रात हा मोठा घोटाळा असल्याचे स्पष्ट होत असून, 3 हजारांहून अधिक शिक्षक बोगस असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

गुप्त तपासणीत मोठा घोटाळा उघड
शिक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या तपासणीत काही शिक्षक शाळांमध्ये प्रत्यक्ष हजर नसल्याचे आढळून आले. त्यानंतर सखोल चौकशीत अनेक जण बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक म्हणून कार्यरत असल्याचे उघड झाले. यानंतर शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारत पहिल्या टप्प्यात 51 शिक्षकांचे वेतन बंद केले आहे. तसेच, त्यांना आतापर्यंत दिलेला पगारही वसूल केला जाणार आहे.

सर्व शाळांची चौकशी करण्याची मागणी
हा प्रकार उघड झाल्यानंतर शिक्षण तज्ज्ञांनी सर्व शाळांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यातील सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये आणखी किती बोगस शिक्षक कार्यरत आहेत, याचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमण्याची मागणी होत आहे.

गुन्हे दाखल करण्याची शक्यता
शिक्षण विभागाने बोगस शिक्षकांवर फौजदारी कारवाई करण्याची शक्यता व्यक्त केली आहे. बनावट कागदपत्रे तयार करून शासकीय पगार घेतल्यामुळे यातील आरोपींवर फसवणुकीचे गुन्हे दाखल होऊ शकतात.

जिल्ह्यात शिक्षण व्यवस्थेत इतक्या मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर पालक व शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी शासनाने यावर कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. पुढील काही दिवसांत आणखी शिक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने