Top News

Big Breaking : जळगावात जुन्या वादातून २२ वर्षीय तरुणावर गोळीबार


वाढदिवस साजरा करतांना घडली घटना, तरुण गंभीर जखमी, घटनास्थळी पोलिस दाखल 

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील मध्यवर्ती भागात गुरुवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. मू.जे.महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या मीनाताई ठाकरे कॉम्प्लेक्ससमोर महेंद्र उर्फ दादू समाधान सपकाळे (वय २२, रा. प्रबुद्ध नगर, पिंप्राळा) या तरुणावर गोळीबार करण्यात आला. हा हल्ला वाढदिवस साजरा करत असताना झाला असून सपकाळे गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोळी त्याच्या कमरेच्या हाडात अडकली आहे.

वादाचा उगम रामनवमीच्या दिवशी प्राथमिक चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, महेंद्र सपकाळे याचा राम नवमीच्या दिवशी नाचताना काही तरुणांशी वाद झाला होता. त्यानंतरही पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वाढदिवसाच्या कार्यक्रमात गोळीबार गुरुवारी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास भूषण अहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केक कटिंग कार्यक्रमासाठी महेंद्र सपकाळे गेला होता. कार्यक्रम सुरू असतानाच काही अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक गोळीबार केला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांकडे ३ ते ४ बंदुका व धारदार शस्त्रे होती. त्यांनी अनेक राउंड फायर केल्याची माहिती आहे.

धावून घरात लपल्यामुळे वाचला जीव गोळीबाराच्या भीतीने महेंद्र सपकाळे धावत जवळच्याच एका घरात लपला. त्याचवेळी एक गोळी त्याच्या कमरेत घुसली. प्राथमिक उपचारानंतर त्याला जिल्हा रुग्णालयातून खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलीस तपासात महत्त्वपूर्ण पुरावे घटनेनंतर अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत तसेच रामानंद नगर व जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड व पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

पोलिसांनी घटनास्थळावरून २ काडतुसे जप्त केली आहेत. तसेच एका संशयिताच्या घरी सापडलेल्या तलवारीमुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. जखमी महेंद्र व त्याच्या मित्रांनी दिलेल्या जबाबानुसार विशाल कोळी, बाबू धोबी व इतर काही जणांनी हल्ला केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने