जळगावात ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरात हर्बल लाईफ कंपनीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून ६६ लाख ४० हजार ५ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी ५ जणांविरोधात रामानंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा १ मार्च २०२५ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास दाखल झाला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींना तात्काळ अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ही घटना जळगाव शहरातील हॉटेल चाय शाय बारमध्ये ३१ जुलै २०२३ ते १ मार्च २०२५ या कालावधीत घडली. फिर्यादी माधुरी अनिल चांदोरीकर (वय ३१, रा. रासने नगर, सावेडी, अहमदनगर) यांनी रामानंदनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित आरोपींनी त्यांना हर्बल लाईफ कंपनीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. आरोपींच्या गोड बोलण्यामुळे माधुरी चांदोरीकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या रकमेची गुंतवणूक केली.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, ३१ जुलै २०२३ ते आजतागायत त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या खात्यातून, बँक खाते, सीडीएम मशीन आणि रोख स्वरूपात ८६ लाख ६४ हजार ९९९ रुपये आरोपींनी घेतले. यापैकी फिर्यादीला २० लाख २४ हजार ९९४ रुपयांचा नफा परतावा म्हणून दिला गेला, परंतु त्यानंतर ज्या अपेक्षित परताव्याचे आश्वासन देण्यात आले होते, ते आरोपींनी पूर्ण केले नाही. त्यामुळे फिर्यादीचे ६६ लाख ४० हजार ५ रुपयांचे मुद्दल परत न मिळाल्याने ती आर्थिक फसवणूक झाली आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून आशा कमलेश रूपाणी, कमलेश हेमचंद्र रूपाणी, दीपेश कमलेश रूपाणी, आश्लेष कमलेश रूपाणी (सर्व रा. खामगाव, जि. बुलढाणा, ह. मु. पर्पल व्ह्यू अपार्टमेंट, शिवम कॉलनी, जळगाव) आणि आकाश सिद्धू वर्मा (वय ३२) यांचा समावेश आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे हे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत.
या प्रकरणामुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. गुंतवणूक करून अधिक रकमेचा परतावा देण्याचे आमिष दाखवणाऱ्या टोळ्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिसून येत आहेत. या प्रकरणावरून नागरिकांनी सतर्क राहून अशा प्रकारच्या फसवणुकीपासून बचाव करण्याची आवश्यकता आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा