Top News

रेल्वे स्थानकातील उन्हात ठेवलेल्या मिनरल वॉटर बाटल्यांचा साठा प्रवाशांसाठी धोकादायक


उन्हात ठेवलेला पाणी साठा प्रवाशांसाठी आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक, उन्हात ठेवलेल्या बाटल्यांमुळे पाणी झाले कडवट, महिला प्रवासीने केली तक्रार, रेल्वे प्रशासनाची त्वरित कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I रेल्वे स्थानकावर पाणी विक्रीसाठी ठेवलेल्या मिनरल वॉटर बाटल्यांच्या साठ्यात झालेल्या धक्कादायक प्रकारामुळे प्रवाशांची चिंता वाढली आहे. फलाटावर उघड्या आकाशाखाली उन्हात ठेवलेल्या या बाटल्यांमुळे पाण्याची चव बदलत आहे, ज्यामुळे अनेक प्रवाशांनी तक्रारी केल्या आहेत.

सध्या जळगाव रेल्वे स्थानकावर दररोज सुमारे ७०० बॉक्स मिनरल वॉटर बाटल्यांची विक्री होत आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी मुंबई येथील एक महिला प्रवासी जळगाव स्थानकावरून रेल्वे नीर मिनरल बाटली घेत होती. मात्र, त्या बाटलीतील पाणी कडवट चवीचे होते. महिला प्रवाशाने या बाबत त्वरित तक्रार केली आणि मध्य रेल्वेच्या तक्रार हेल्पलाइन तसेच आयआरसीटीसीकडे संपर्क साधला.

रेल्वे प्रशासनाने या तक्रारीची दखल घेतली असून, मध्य रेल्वे आणि आयआरसीटीसीने भुसावळ विभागाच्या आरोग्य विभागाकडे तक्रार वर्ग केली आहे. तसंच, जळगाव स्थानकावरून पाणी बाटल्यांचे नमुने घेण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.

रेल्वे प्रशासनाने या साठ्याबाबत तपास सुरू केला आहे. स्थानकावर १५ खाद्य विक्री स्टॉल्स असून, त्यात १० स्टॉल्स आणि ५ ट्रॉली स्टॉल्स आहेत. सर्व स्टॉल्सवर रेल नीर पाणी बाटल्या विक्री होत आहे. तथापि, स्थानकावर विविध फलाटांवर तसेच स्टॉल्सच्या बाहेर देखील मिनरल वॉटर बाटल्यांचा साठा उघड्यावर ठेवला जात आहे.

हे पाणी कडवट होण्याचे मुख्य कारण म्हणजे बाटल्यांमधील हानिकारक रसायने सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या प्रभावाखाली पाणी विरघळून त्याची चव बदलतात. पाणी अशा स्थितीत आरोग्यास हानिकारक होऊ शकते. सूर्यप्रकाशामुळे बाटल्यांतील रसायने पाण्यात मिसळली जातात, ज्यामुळे त्या पाण्यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता आहे.

रेल्वे प्रशासनाच्या या प्रकरणावर त्वरित लक्ष देण्याच्या संकेतावरून स्थानकावरच्या पाणी बाटल्यांचा तपास सुरू करण्यात आलेला आहे, आणि त्या संदर्भात संबंधित विभागाकडून पुढील कारवाई केली जाईल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने