Top News

भूकरमापकाला ४ हजार रुपयांची लाच घेताना अटक

जळगावातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एरंडोल तालुक्यातील निंभोरा येथे आज मोठी कारवाई करत भूमी अभिलेख कार्यालयाच्या भूकरमापकाला ४ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. आरोपी राजेंद्र रमेश कुलकर्णी (वय ४८) याला तक्रारीच्या आधारे सापळा रचून पकडण्यात आले.

लाच प्रकरणाचा तपशील:
मस्कावद (ता. रावेर) येथील एका ३० वर्षीय शेतकऱ्याने ४ मार्च २०२५ रोजी ACB कडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदार आणि त्यांच्या काकांची मस्कावद येथे सामायिक शेतजमीन असून, तिच्या मोजमापासाठी ७ जानेवारी २०२५ रोजी अर्ज केला होता.

१८ फेब्रुवारी २०२५ रोजी भूकरमापक राजेंद्र कुलकर्णी यांनी शेतजमिनीचे मोजमाप केले, परंतु मोजमापाच्या खुणा दाखवण्यासाठी ५,५०० रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर कुलकर्णी यांनी लाच हरभऱ्याच्या स्वरूपात देण्यासही सांगितले. यानंतर तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पडताळणी दरम्यान, आरोपीने लाचेची रक्कम ५,५०० वरून ४,००० रुपयांवर आणली.

रंगेहाथ पकडले:
आज, २६ मार्च २०२५ रोजी निंभोरा येथे एका शेताजवळ तक्रारदाराकडून ४,००० रुपये लाच स्वीकारताना कुलकर्णी यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

कारवाईतील अधिकारी आणि पुढील तपास:
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पो.कॉ. राकेश दुसाने आणि पो.कॉ. अमोल सूर्यवंशी यांनीही कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

नागरिकांसाठी आवाहन:
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने लाच मागितल्यास तात्काळ ०२५७-२२३५४७७ किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.

निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल:
आरोपीविरुद्ध निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील चौकशी सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने