Top News

ग्रामपंचायत सदस्य श्रावण धाडे ठरले अपात्र, तिसरे अपत्य लपविल्याचा आरोप


जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I राजुरे ता. मुक्ताईनगर येथील ग्रामपंचायत सदस्य श्रावण काशिनाथ धाडे हे २८ ऑक्टोबर २०२३ रोजी राखीव जागेवर निवडून आले होते. मात्र, त्यांना संबंधित निवडणुकीच्या दरम्यान अपत्यांची माहिती चुकीची दिल्याचा आरोप आहे. निवडणूक अर्ज दाखल करतांना त्यांच्या कडून तीन अपत्यांची माहिती लपवून फक्त दोन अपत्यांची माहिती दिली गेली. यावरुन अशोक भोलाणकर, राहुल रोटे व योगेश कांडेलकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे तक्रार दाखल केली.

या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने चौकशी केली, आणि त्यामध्ये सिद्ध झाले की श्रावण धाडे यांच्या तीन अपत्ये आहेत - शुभांगी, गणेश आणि स्नेहल. या तिसऱ्या अपत्याची माहिती लपवून त्यांच्या निवडणुकीला अन्यायकारक लाभ मिळवण्यात आल्याचा निष्कर्ष काढला गेला.

तसेच, धाडे यांनी राखीव प्रवर्गातून निवडून येत असताना निर्धारित वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नव्हते, ज्यामुळे आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली होती. जिल्हाधिकारी, जळगांव यांनी यावरून दोनही अर्जावर कारवाई केली आणि श्रावण धाडे यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४(ज-१) आणि कलम १०(१-अ) प्रमाणे अपात्र ठरवले.

या कारवाईमुळे ग्रामपंचायत सदस्यांच्या वर्तमाने खळबळ उडाली असून, संबंधित ग्रामपंचायतीत सध्या मोठ्या वादाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रावण काशिनाथ धाडे यांच्या विरुद्ध केलेली कारवाई त्यांच्यासाठी मोठा धक्का ठरली आहे, कारण त्यांना निवडणुकीमध्ये अपात्र ठरवले गेल्याने त्यांचा पदावर राहण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने