भटक्या कुत्र्याला मोटारसायकलला बांधून फरफटत नेणाऱ्या युवकावर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव अपडेट न्यूज, प्रतिनिधी I भटक्या कुत्र्याने आपल्या बकरीला चावा घेतल्याच्या रागातून तांबापुर येथील एका युवकाने कुत्र्याला मोटारसायकलला बांधून फरफटत नेण्याचा अमानुष प्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी संबंधित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10.15 वाजताच्या सुमारास तांबापुर येथील सलीम अन्सारी या युवकाच्या बकरीला एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला. याचा राग मनात धरून अन्सारी याने कुत्र्याला दोरीने आपल्या एमएच 19 डीडी 7865 क्रमांकाच्या हिरो होंडा पॅशन मोटारसायकलला बांधले आणि फरफटत नेत असताना डी-मार्ट समोरील विद्या इंग्लिश स्कूलजवळ काही तरुणांनी हा प्रकार पाहिला.
तरुणांनी अन्सारीला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने मोठ्या आवाजात ओरडत अरेरावीची भाषा वापरली. घटनास्थळी झालेल्या गोंधळानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करून कुत्र्याला त्याच्या तावडीतून सोडवले आणि महाबळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.
या घटनेची माहिती मिळताच भाग्येश मगर यांनी एमआयडीसी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सलीम अन्सारीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल रामदास कुंभार करीत आहेत.
या अमानुष घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात असून, पशू क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा