Top News

मोठी बातमी : जळगाव शहरातील शाहू नगरमध्ये एमडी ड्रग्जचा माल जप्त, एकाच्या मुसक्या आवळल्या

पोलिसांनी ५ लाख ३४ हजार रुपये किंमतीचे ५३.४० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त; आरोपीचा गुन्हेगारी इतिहास, सखोल तपास सुरू

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरातील शाहू नगर भागात एमडी ड्रग्जची साठवणूक करून विक्री करणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत ५ लाख ३४ हजार रुपये किंमतीचे ५३.४० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

जळगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आनंद निकुंभ आणि प्रफुल्ल धांडे गस्तीवर असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, शाहू नगरातील एका घरात एमडी ड्रग्जचा साठा करून विक्री केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी, २२ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता शाहू नगर येथे छापा टाकला आणि सर्फराज जावेद भिस्ती (वय-२३, रा. शाहू नगर) याच्या घरातून ५३.४० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केला. सर्फराज जावेद भिस्ती याला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर यापूर्वी आर्म्स ॲक्टअंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

पोलिस तपासात सर्फराज जावेद भिस्ती याचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा इतिहास असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस आता त्याच्याकडून एमडी ड्रग्ज कुठून आणले, त्याचा पुरवठादार कोण आहे आणि त्याने हे ड्रग्ज कोणाला विकले याचा तपास करत आहेत. सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांनी सांगितले की, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे आणि आणखी महत्त्वाच्या धाग्यांपर्यंत पोलिस पोहोचण्याची शक्यता आहे.

या कारवाईत जळगाव शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील, सुनील पाटील, रणजीत पाटील तसेच पोलिस कर्मचारी सतीश पाटील, प्रफुल्ल धांडे, योगेश पाटील, चंद्रकांत सोनवणे, उद्धव सोनवणे, प्रणय पवार, अमोल ठाकूर आणि विजय निकुंभ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्जचा पुरवठा रोखण्यात यश आले आहे. पोलिस प्रशासनाने नागरिकांना अशा प्रकारच्या बेकायदेशीर धंद्यांविषयी तत्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने