संत गाडगेबाबा उद्यानात पूजन, शोभायात्रेचा शुभारंभ, एमपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्या तरुणांचा विशेष सत्कार,
स्वच्छता अभियान, महाप्रसाद भंडारा यासह उत्सवाचा समारोप
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I निष्काम कर्मयोगी आणि मानवतेचे पुजारी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती विविध समाजिक संघटनांच्या वतीने जल्लोषात साजरी करण्यात आली. संत गाडगेबाबा उद्यानात संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण जळगाव जिल्हा परीट धोबी सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. अरुणभाऊ शिरसाळे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाल" ह्या गजरात ढोल ताशे व पारंपरिक वाद्यांच्या स्वरात शोभायात्रेस प्रारंभ झाला.
शहरातील विविध भागांतून आलेल्या मिरवणुकीचा एकत्रीकरण करून मुख्य शोभायात्रा सुरू झाली. यामध्ये जळगाव जिल्हा परीट धोबी सेवा मंडळ, जळगाव जिल्हा धोबी समाज शिक्षक व शिक्षकेत्तर मंडळ, जुने जळगाव परिसर मित्र मंडळ, जळगाव शहर परदेशी धोबी समाज, गाडगेबाबा नगर धोबी समाज मंडळ, संत गाडगेबाबा बहुद्देशीय संस्था, संत गाडगेबाबा युवा फाउंडेशन, कोंबडी बाजार परिसर धोबी समाज मंडळ, जळगाव जिल्हा सर्व भाषिक धोबी महासंघ यांचा समावेश होता.
शोभायात्रेत संत गाडगेबाबा यांच्या भव्य मूर्तीला सजविलेल्या वाहनावर ठेऊन मिरवणूक केली गेली. त्याचबरोबर संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित आणि त्यांच्या दशसुत्री संदेशांचा प्रचार करणारे चित्ररथ देखील मिरवणुकीत समाविष्ट होते. "स्त्री भ्रूणहत्या थांबवा", "पाणी जिरवा पाणी वाचवा" अशा सामाजिक संदेशांचे वाचन करणारे रथ उपस्थित होते.
संत गाडगेबाबा यांच्याशी संबंधित पारंपरिक वेशभूषेतील महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. याशिवाय, पारंपरिक वाद्यांच्या तालावर युवकांचे झांज पथक, लाठी काठी व दांडपट्ट्याच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
मिरवणुकीच्या मार्गावर चौकाचौकात विविध समाज आणि संस्थांच्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, शिक्षण विस्तार अधिकारी व शा.पो.आ.अध्यक्ष विजय पवार, जिल्हा शिवसेना प्रमुख, माजी महापौर विष्णू भंगाळे, नगरसेवक गणेश सोनवणे हे सुध्दा मिरवणुकीत सहभागी झाले होते.
शिस्तबद्धपणे संत गाडगेबाबा उद्यान येथून सुरू झालेल्या शोभायात्रेचा समारोप स्टेडियम चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक आणि जुने कोर्ट चौक मार्गे संत गाडगेबाबा उद्यान येथे झाला. उद्यानात मिरवणुकीत सहभागी मंडळांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच, एमपीएससी महसूल विभागाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दोघा तरुणांचा, जयकिशन अशोक सपकाळे आणि अनिकेत सतीश जाधव यांचा समाजाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जळगाव जिल्हा धोबी सेवा मंडळाचे सहसचिव अरुण सपकाळे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गणेश बच्छाव यांनी केले.
कार्यक्रमानंतर दुपारी महाप्रसाद भंडारा आयोजित करण्यात आला आणि परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या यशस्वी जयंती उत्सवाच्या आयोजनात सहभागी सर्व समाज संस्था, पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.
टिप्पणी पोस्ट करा