Top News

पुणे शहर हादरले, स्वारगेट बसस्थानकावर २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार


आरोपी शोधण्यासाठी पोलिसांची आठ पथके रवाना, सदरील घटना पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली 

जळगाव अपडेट न्यूज, पुणे, वृत्तसंस्था I बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकावर एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत आरोपी असलेल्या दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५, राहाणारी शिक्रापूर) याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आठ पथके रवाना केली आहेत. आरोपीवर यापूर्वी जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत.

पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितल्यानुसार, पीडित तरुणी फलटणला जाण्यासाठी पहाटे साडेपाच वाजता स्वारगेट बसस्थानकावर आली होती. तिला एका व्यक्तीने फलटणला जाणारी बस इकडे नाही, तर तिकडे लागते, असे सांगितले. तेव्हा तरुणीने इकडेच फलाटावर बस लागते, असे सांगितल्यावर त्या व्यक्तीने तिच्याशी गोड बोलून, "मी १० वर्षे इथे आहे. तिकडे लागणारी बसच फलटणला जाते," असे सांगून तिला आडबाजूला उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेले. बसमध्ये अंधार होता. त्या व्यक्तीने तरुणीला दरवाजा उघडून आत जायला सांगितले. तरुणी बसमध्ये गेल्यावर तोही तिच्या मागोमाग आत आला आणि दरवाजा लावून तिच्यावर बलात्कार केला.

या घटनेनंतर ती तरुणी फलटणला जाण्यासाठी निघाली, परंतु अर्ध्या वाटेवरून परत येऊन तिने स्वारगेट पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार केली. पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यात आरोपी ओळखला गेला. आरोपी दत्तात्रय गाडे याच्यावर पुणे ग्रामीण पोलिसांमध्ये जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत.

सध्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या आठ पथका कार्यरत आहेत. या घटनेमुळे समाजात राग आणि नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने