Top News

बुलेट मोटरसायकलची चोरी करणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी केली अटक

संशयीत चोरट्यांकडून १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या दोन बुलेट मोटरसायकली हस्तगत

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील सिंधी कॉलनी आणि मास्टर कॉलनी भागातील बुलेट मोटरसायकली चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे पोलीस विभागाने कडक कारवाई केली आहे. एमआयडीसी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या कडून १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या दोन बुलेट मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात मोटरसायकली चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी गुन्हे शोध पथकातील पोलिसांना मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, सिंधी कॉलनी येथून बुलेट चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील तपासी अंमलदार किशोर पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्याद्वारे आरोपींचा शोध घेतला.

आरोपी म्हणून जावेद शेख चांद (मास्टर कॉलनी) आणि अदनान अमजद खान (शाहूनगर) यांची ओळख पटली. दोघांना २२ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना २४ फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावली.

तपासादरम्यान, दोन्ही आरोपींनी १३ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री साडेदहा ते साडेपाच वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनी येथील हर्षद दिलीप कुमार नागपाल यांच्या घरासमोरून एक बुलेट मोटरसायकल चोरी केली होती. त्यानंतर, कोठडी दरम्यान, दोन्ही आरोपींनी मास्टर कॉलनी येथून आणखी एक बुलेट चोरी केली असल्याचे कबूल केले. यावरून, पोलिसांनी त्यांच्या कडून दोन बुलेट मोटरसायकली हस्तगत केल्या, ज्यांची एकूण किमत १,३०,००० रुपये आहे.

या यशस्वी कारवाईमुळे जळगाव शहरात चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यात पोलिसांना यश आले आहे, आणि पुढील कारवाईसाठी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने