गोरेगाव पोलीस ठाण्यात धमकीचा ई-मेल प्राप्त; मुंबई पोलिसांची सर्तक तपास प्रक्रिया सुरू
जळगाव अपडेट न्यूज, मुंबई, प्रतिनिधी I मुंबईतील शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांना एक ई-मेल मिळाला असून त्यात त्यांची कार बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात हा धमकीचा ई-मेल आला असून, मुंबई पोलिसांकडून या ई-मेलच्या पाठकांचा शोध सुरु आहे. या धमकीचा ई-मेल मुंबईतील 7 ते 8 पोलीस ठाण्यांमध्ये आले आहे. तपास सुरू असताना, मंत्रालय पोलीस आणि जेजे मार्ग पोलीस ठाण्यातही धमकीचा ई-मेल प्राप्त झाला आहे.
पोलिसांनी अज्ज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली असून, मुंबई गुन्हे शाखेने तपास सुरु केला आहे. हे धमकीचे प्रकार मागच्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या धमकीत एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख का केला गेला, आणि ई-मेल कोणत्या व्यक्तीने पाठवला, याची चौकशी करण्यात येत आहे.
सर्व तपास यंत्रणा सर्तक असून, शिंदे यांना यापूर्वीही नक्षलवाद्यांकडून धमक्या मिळाल्या होत्या. सध्या एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये आहेत. ते महायुतीचे नेते दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधीसमारंभासाठी गेले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात संवाद होईल, अशी माहिती आहे.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणी कडक चौकशी सुरू केली असून, लवकरच धमकी पाठवणाऱ्याला ताब्यात घेण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा