कुटुंबियांना धक्का, नशिराबाद पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे महावितरणचे काम करीत असताना एका मजुराला विजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. मृतकाचे नाव अशोक तिजू पुराम (वय ३९, रा. सुकडी ता. देवरी जि. गोंदिया, ह. मु. भादली रोड) असे आहे.
महावितरणने विविध कामांसाठी कंत्राट दिलेले भारत इलेक्ट्रिक कंपनी, कुपवाड, जि. सांगलीच्या वतीने हे काम सुरू होते. कंपनीचे सुपरवायझर हर्षल कदम यांच्या सांगण्यानुसार काही मजूर नशिराबाद येथे महावितरणचे काम करीत होते. बुधवारी सकाळी बाजारपट्टा भागात काम सुरु असताना अशोक पुराम यांच्याकडून वीज बंद करताना काहीतरी चूक झाली असावी. यामुळे सिमेंटच्या खांबात विद्युतप्रवाह उतरला आणि अशोक पुराम यांना विजेचा जोरदार धक्का बसला, त्यात ते खाली पडले.
सोबतच्या मजुरांनी त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. ही घटना सोबत काम करत असलेल्या मजुरांसाठी धक्का देणारी ठरली आहे.
मृतक अशोक पुराम यांच्या कुटुंबियांना गोंदिया येथून कळविण्यात आले आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह त्यांच्या गावी, सुकडी येथे रवाना करण्यात आला आहे. घटनेची नोंद नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू म्हणून केली आहे. दरम्यान, महावितरण व भारत इलेक्ट्रिक कंपनीच्या कामामध्ये सुरक्षा उपाययोजना यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा