तीन तरुणांनी धमकी देत व्यापारीला मारहाण, पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव रेल्वे स्थानकावर आग्रा येथील व्यापारी शाहिद मुन्ना कुरेशी यांच्यावर तिन्ही तरुणांनी मारहाण केली आणि त्यांना खोट्या केसमध्ये फसवण्याची धमकी देऊन २० हजार रुपयांची मागणी केली. १ फेब्रुवारी रोजी दुपारी ३:३० वाजता जळगाव रेल्वे स्टेशनवर उतरलेले शाहिद कुरेशी हे पानटपरीवर पान खात असताना त्यांचा मोबाईल पाहून तीन तरुणांनी त्यांना घेरले. मोबाईलमधील गायींच्या व्हिडिओचा विषय काढून त्यांना गायींना कापण्याचे आणि व्यवसाय करणारे म्हणून धमकावले. त्यानंतर, तिघांनी शाहिदला दुचाकीवर बसवून गावच्या बाहेर नेले आणि त्यांना खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली.
शाहिद कुरेशी यांच्याकडून २० हजार रुपयांची मागणी केली गेली. घाबरलेल्या शाहिदने आपल्या वडिलांकडून २ हजार रुपये मागवून घेतले आणि पेटीएम सेंटरवरून पैसे काढून दिले. परंतु, तिघांनी पोलिसांत तक्रार केली तर जीवे मारण्याची धमकी दिली. अखेरीस, रात्री ७ वाजता या घटनेची नोंद जळगाव शहर पोलिसात झाली.
त्यानंतर, पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू केली. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संशयित आरोपींची माहिती मिळाली. पोलिसांनी मनोज आधार सोनवणे (२३), यश रविंद्र पाटील (२१), आणि महेंद्र पांडुरंग पाटील (२८) यांना त्यांच्या घरून ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्हा कबूल केला असून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्या पथकाने केला. यामध्ये सपोनि रामचंद्र शिखरे, सफौ. सुनिल पाटील, पोहेकॉ संतोष खवले, पोहेकॉ उमेश भांडारकर, पोहेकॉ सतिश पाटील, पोहेकॉ भास्कर ठाकरे, पोहेकॉ योगेश पाटील, पोहेकॉ किशोर निकुंभ, पोना चंदु सोनवणे, पोकॉ. अमोल ठाकूर, पोकॉ. पांचाळ आणि पोकॉ. प्रणय पवार यांचा सहभाग होता.
या घटनेवरून पोलिसांनी तत्काळ आणि प्रभावी कारवाई केली असून तिघांना पकडून न्यायालयात हजर केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा