ग्रीन एन इको सोल्युशन, आर.जी. इंटरप्रायझेसमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास चोरी, सीसीटीव्ही फुटेजमधून तीन अज्ञात चोरटे कैद
जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I शनिवारी सकाळी एमआयडीसीमधील ई सेक्टरमधील दोन कंपन्यांमध्ये झालेल्या चोरीची घटना उघडकीस आली. या चोरीत एकूण ४ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आले. "ग्रीन एन इको सोल्युशन" आणि "आर.जी. इंटरप्रायझेस" या कंपन्यांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी घुसून चोरी केली.
पहिल्या घटनेत, ग्रीन एन इको सोल्युशन या कंपनीच्या शटरला वाकवून चोरट्यांनी कंपनीत प्रवेश केला आणि कार्यालयातील कपाटामधून ३ लाख रुपये चोरले. यावेळी कंपनीचे मालक जिग्नेश शरद शेठ यांचे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते, आणि शेठ घरातील एका माळ्यावर झोपले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी कंपनीतील कामगारांनी शटर वाकलेले पाहून घटना पोलिसांना कळवली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, चोरटे पहाटे २.२० ते ३.३० वाजेच्या दरम्यान चोरी करताना दिसत आहेत. हे फुटेज पोलिसांनी जप्त करून तपास सुरू केला आहे.
दुसऱ्या घटनेत, आर.जी. इंटरप्रायझेस कंपनीतून १ लाख ८ हजार रुपये चोरी झाले आहेत. या घटनेतही तिघे अज्ञात चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पकडले गेले आहेत. दोन्ही चोरीच्या घटनांमध्ये समान पद्धतीने चोरी करण्यात आली आहे, ज्यामुळे पोलिसांना शंका आहे की, एका टोळीने दोन्ही ठिकाणी चोरी केली आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दोन्ही घटनांमध्ये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा