Top News

दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न; ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल


पोलिसांनी ४ तरुणसह ३ अल्पवयीन मुलांना रंगेहाथ पकडले, एक जण फरार

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जिल्ह्यात दहावीच्या मराठी विषयाच्या पेपरमध्ये कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये ४ तरुणसह ३ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. शनिवारी, २१ फेब्रुवारी रोजी मराठी विषयाच्या पेपरात हे प्रकरण समोर आले.

काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज जळगाव येथे दहावीच्या परीक्षेचे केंद्र आहे. पेपर सुरु असताना शाळेच्या इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या शौचालयाच्या जवळ काही जण संशयास्पद हालचाली करत होते. पोलीसांची नजर लागली आणि त्यांनी त्वरित त्या व्यक्तींना ताब्यात घेतले. अंगझडती केली असता त्यांना खिशात कागद सापडले. या कागदांवर हस्तलिखित आणि टंकलिखित स्वरूपात मराठी पेपराच्या प्रश्नोत्तऱ्या लिहिल्या होत्या.

चौकशीत या व्यक्तींनी सांगितले की, ते दहावीच्या परीक्षेत कॉपी करण्यासाठी या प्रश्नोत्तऱ्या घेऊन आले होते. त्यांच्या कबूलनाम्यानुसार, राहुल रवींद्र कोळी (वय अंदाजे ३० वर्षे, नशिराबाद) याने या प्रश्नोत्तऱ्या उपलब्ध करून दिल्या होत्या. दिगेंद्र भरतसिंग पाटील (वय १८ वर्षे, मन्यारखेडा) याने त्या प्रश्नोत्तऱ्या आपल्या अल्पवयीन मित्रांमार्फत सागर नारायण बारी (वय २३ वर्षे, श्रीकृष्णनगर) याच्याकडे पाठवल्या होत्या. सागर बारी हा गुरुकुल कॉम्प्युटर्समध्ये काम करतो. त्याने त्या प्रश्नोत्तऱ्यांची पीडीएफ फाईल तयार केली आणि दिगेंद्र पाटीलला पाठवली. दिगेंद्रने ती फाईल त्याच्या अल्पवयीन मित्रांना दिली, ज्यांनी किरण नंदलाल परदेशी (वय २८ वर्षे, ढाकेवाडी) यांच्या मोबाईल दुकानातून त्या प्रश्नोत्तऱ्यांचे प्रिंटआउट घेतले.

पोलिसांनी दिगेंद्र पाटील, सागर बारी, राहुल कोळी, किरण परदेशी आणि तीन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राहुल कोळी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या टोळीला प्रश्नोत्तरे कशी मिळाली, याचा तपास सुरू आहे.

तपासाचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक रंगनाथ धारबळे यांचे आहे. त्यांच्यासोबत महिला पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर, पोलीस हवालदार गिरीश पाटील, उमेश ठाकूर, प्रतिभा पाटील, भागवत शिंदे आणि होमगार्ड कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत आहे.

तपासाच्या पुढील प्रगतीबाबत पोलीस अधिक तपशील लवकरच जाहीर करणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने